हळद - लाकाडोंग

 

लाकाडोंग हळद  




बहुगुणी, आरोग्यदायी … मेघालयाची लाकाडोंग हळद




आपल्याकडे ‘पी हळद अन् हो गोरी असं होत नाही’ असे घाईघाईने काम उरकणाऱ्यांना म्हटले जाते. त्या मागे असा अर्थ आहे की, काही कामे सखोलपणे, लक्षपूर्वक करायची असतात. त्यात घाई गडबड चालत नाही. पण असे म्हणून आपण विनाकारण हळदीला बदनाम केले आहे. वस्तुत: हळद हा भारतीय भोजन व्यवस्थेतील अतिशय महत्वाचा मसाला आहे. हळदीशिवाय जेवण रुचकर तर होत नाहीच. शिवाय जीवनही शक्तीवर्धक, आरोग्यदायी होऊ शकत नाही. हळदीत त्वचा उजळ करण्याची आणि जखम भरून टाकण्याची अपूर्व ताकद शिगोशिग भरलेली आहे. हे रहस्य हजारो वर्षांपूर्वी जेवण तयार करणाऱ्या भारतीय मातांना कळाले. त्यामुळेच आज भारतातील सर्वच प्रांतातील जेवणात हळदीला प्रचंड महत्व आहे.



भारतामध्ये अनेक ठिकाणी हळदीचे पीक घेतले जाते. मुख्यत्वेकरून तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील भाग, गुजरात तसेच पश्चिम महाराष्ट्रात हळदीचे उत्पन्न होते. मराठवाड्यातील काही शेतकरीही अलिकडे हळदीच्या शेतीकडे वळाले आहेत.



स्वयंपाकात हळदीचा उपयोग खाद्य पदार्थाला रंग येण्यासाठीही केला जातो. हळदीच्या वापराने एक प्रकारचा चटकपणा येतोच. शिवाय त्याचा गंधही दीर्घकाळही दरवळत राहतो. हळदीची जीव जिभेवर रेंगाळत राहते. साधारणत: हळदीचे तीन प्रकार असतात. ते असे.


१) दगडी हळद - रंग करण्यासाठी वापरतात.


२) मऊ हळद – खाद्य पदार्थांच्या मसाल्यात वापरतात


३) जंगली हळद किंवा आंबे हळद – जखमा भरणे किंवा पाय मुरगळल्यास, स्नायू दुखावल्यास त्यावर लावली जाते.



हळदीचे गुण अनेक जुन्या आजारांवर उपयोगी पडतात. त्यातील कुरक्युमिन (Curcumin) नावाचा भाग आजारांवर बहुगुणी आहे. त्याच्या गुणकाचे प्रमाण वैद्यक शास्त्रात सांगितले आहे. गरम दुधात एक चमचा हळद पावडर घेतल्यास खोकल्याला प्रतिबंध होतो.



आता आपण मेघालयाकडे वळूयात. तेथे लाकाडोंग नावाच्या हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. लाकाडोंगमध्ये क्युरक्युमिनचे (Curcumin) प्रमाण अधिक असते.



साध्या हळदीपेक्षा लाकाडोंगचे गुणधर्म वेगळे आहेत. ते असे.



१. लाकाडोंग हळदीमध्ये कुरक्युमिनचे प्रमाण ७.५ पेक्षा जास्त असते. साध्या हळदीत ते ३ पर्यंतच असते.


२. हळदीचा रंग पूर्ण वेगळा असतो. लाकाडोंग हळद सोनेरी पिवळी असते. नजरेला तिचे वेगळेपण लगेच जाणवते.


३. लाकाडोंग हळदीची चवही वेगळी असते. तशी न सांगता येण्यासारखी पण वेगळी आणि छान.


४. सगळ्यात मोठा फरक जाणवतो तो म्हणजे लाकाडोंगचा सुवास. कोणत्याही खाद्यपदार्थात लाकाडोंग वापरली स्वयंपाकघरात सुवास पसरतो.


५. लाकाडोंगमधील नैसर्गिक गुणधर्मामुळे ती अतिशय कमी प्रमाण वापरली तरी चालते. 

६. लाकाडोंग तुलनेते किंचित महाग असली तरी ही हळद अतिशय कमी लागत असल्याने जास्त दिवस चालते. यात तुमची मोठी बचतही होते.


७. मलाविरोध, हृदयरोग, मधुमेही तसेच अल्झायमर, नैराश्य, त्वचा रोग, संधीवाताचे काही प्रकार, डोळ्यांचे विकार आणि एकूणच आरोग्यासाठी लाकाडोंगमधील कुरक्युमिन अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लाकाडोंग किती प्रमाणात घ्यावी हे ठरवावे आणि नियमितपणे घ्यावी.



अतिशय उपयुक्त, आरोग्यवर्धक अशी हळद आपल्या स्वयंपाकघरात कायम ठेवा आणि वापर करा. कारण ठणठणीत, उत्तम आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे.

☘☘☘


Vishuddham 



Comments

Popular posts from this blog

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती

सैन्द्रीय शेती - २

खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]