बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती
बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती
–
आयुष्य म्हणजे खरे तर एक भटकंतीच असते. आपण एका मुक्कामावरून निघतो. दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. दुसऱ्या ठिकाणावरून तिसरा टप्पा गाठतो. या साऱ्या भटकंतीत अनेक प्रकारची माणसं भेटतात. नवे प्रसंग अनुभवाला येतात. अडचणी येतात आणि त्यावर मात करण्याचे शिक्षणही याच मिळते. काही वेळा ही भटकंती ठरवून असते तर अनेकवेळा अवचित पाहुण्यासारखी ती चालून येते आणि नवे कुटुंब, नवी नाती-गोती तयार करून देते.
अनेक वर्षे पुण्यातच आणि तेही अगदी सर्वोत्तम सोयी-सुविधा असलेल्या ऑफिसमध्ये ठाण मांडून बसलेली मी. गेल्या काही महिन्यांपासून ‘विशुद्धम’च्या निमित्ताने पायाला भिंगरी लावल्यासारखी खूप फिरते आहे. सोलापूर, सासवड, कराड, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी.
२०१७ ला जेव्हा मी नोकरी सोडली. तेव्हा नवे काय करावे, याविषयी डोक्यात अनेक कल्पना भिरभिरत होत्या. आयुष्यातील दोन तपांपेक्षा अधिक म्हणजे तब्बल तीस वर्षे ज्या व्यावसायिक विश्लेषण विषयात झोकून देऊन काम केले. त्याच विषयात आणखी संशोधन करावे. पीएच.डी. मिळवावी, असे वाटत होते. पण विचार स्थिरावत नव्हता. यापूर्वी मी अनेक कंपन्यांमधून कामे केली. व्यावसायिक ग्रुप जोडले होते. माझे सर्व वरिष्ठ अधिकारी अतिशय उत्तम, अभ्यासू होते. त्यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यातील दोघांबरोबर काही कामेही करून पाहिली. तरीही असे वाटत होते की, हे स्वप्न माझे नाही. अशा कामांशी आपली पूर्णपणे नाळ जुळत नाहीये. तरीही त्याच चक्रात फिरत होते. पाहता पाहता तीन वर्षे निघूनही गेली. दरम्यान, स्वतःजवळ काय, काय आहे. पदराच्या गाठीला बांधलेल्या गाठोड्यात अधिक काय, उणे काय असे तपासून घेत होते. त्यात असे लक्षात आले की, आपल्याला मनापासून आवडते ते म्हणजे लोक संपर्क. पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते, हे खरेच आहे. पण एक माणूस नीटपणे वाचता आला तर दहा पुस्तके लिहिता येतील, एवढे आपले जग बदलून जाते. म्हणून स्वतःला बोलता येईल, लोकांना भेटता येईल. मनसोक्त गप्पा करता येतील, असा काहीतरी व्यवसाय करावा, असे डोक्यात घोळू लागले.
आयुष्य असे सगळे रेंगाळत, रेंगाळत सुरू असताना अचानक नव्या दिशेने भटकंती सुरू झाली. माझे एक मित्र यशोधन नाटेकर यांनी एकदिवस एक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन दाखवले. अगदी अमेझॉन, फ्लिपकार्टच्या तोडीचे. त्यात सर्व संगणक तज्ज्ञांची उत्तम जाण, सॉफ्टवेअरमधील अतिशय कष्टाने केलेले काम ठळकपणे जाणवत होते.
यात दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे अॅप्लिकेशन विक्री आणि दुसरे होते त्यातील लिस्टमधील प्रॉडक्ट म्हणजे उत्पादनांची विक्री. ही उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची एक भली मोठी सप्लाय चेन, पुरवठा साखळी तयार करणे.
नाटेकरांनी दाखवलेले अॅप्लिकेशन पाहणे, समजून घेणे तर छान वाटले, आवडले. पण पुरवठादार व्यावसायिकांची चेन तयार करणे कितपत जमेल, याविषयी शंका वाटत होती. वर्षभरापूर्वी या विषयावर चर्चा चालू असताना माझा भाऊ अभिजितसोबत बोलणे होत होते. त्यालाही त्याच्या कॉर्पोरेट जगातून बाहेर पडून काही काम करायचे होते.
जेव्हा मोठी संकटे कोसळतात. त्यात नव्या जगाची सुरुवात कर, असे सांगणारा एखादा आशेचा किरणही दिसत असतो. तसाच प्रकार आमच्याबाबत झाला. आणि आम्हा बहिण-भावंडासाठी कोरोनाचे लॉकडाऊन मोठी पर्वणी ठरली, असे म्हणायला हरकत नाही.
‘सौ बका, एक लिखा’, असे म्हणतात. म्हणजे शंभरवेळा बोलाल त्यापेक्षा एकदा लिहून काढाल तर काम यशस्वी होते. त्यानुसार आम्ही साधारण ऑगस्ट सप्टेंबरपासून नव्या कामाची चर्चा सुरु केली. हे सगळे वास्तवात कसे आणायचे, याचे मुद्दे लिहून काढू लागलो. काही मुद्दे रद्द करू लागलो. लिहिलेले प्रत्यक्षात आणत शेतकऱ्यांशी मुक्त संवाद सुरू झाला.
बोलण्याच्या ओघात थोडंसं मागं वळून एक मुद्दा सांगते. मी संख्याशास्त्राची विद्यार्थिनी. आमच्यासाठी शेती म्हणजे आकडेमोड. त्यासाठी अगदी कृषी विद्यापीठांनाही भेटी दिल्या होत्या. सध्या संख्या शास्त्राची गरज आणि उपयोग वाढत असला तरी माझ्या दृष्टीने त्यावेळेस माझ्यासमोर बँक, सरकारी नोकरी, प्रोफेसर असे थोडे पर्याय होते. त्यातील व्यावसायिक विश्लेषकाचे काम निवडले. तीस वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे, जीव ओतून केले.
त्यात तयार झालेला पिंड बहुधा ‘विशुद्धम’च्या नव्या कामातही कामी आला असावा. अनोख्या क्षेत्रात उडी घेतल्याने त्यात अधिक ताजेपणा आला. नैसर्गिक शेती काय असते? रसायनविरहीत शेती म्हणजे काय? जीवामृत, घनामृत, ब्रम्हास्त्र असे नवीन शब्द शिकू लागलो. शाळेत असताना किती आंतरपीक घेणे का गरजेचे? कोणते पीक कुठे अधिक येते? कोणत्या पिकावर कोणते पीक लावणे असे शिकले होते. पण ते होते पुस्तकातले. आता शेतात जाऊन पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात पाहणे, तपासणे, अनुभवणे, मेंदूत आणि हृदयातही साठवणे सुरू केले.
जसजसे रोज रसायनविरहीत, नैसर्गिक शेती करणाऱ्यांशी बोलणे सुरू झाले. तसे लक्षात येऊ लागले की, ‘विशुद्धम’चा हा अतिशय बोलका व्यवसाय आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा सगळ्या घराचा व्यवसाय आहे. मी, आई, मुलगी अर्पिता, पती अजय, माझी बहिण, मेहुणा, भाऊ, वहिनी, भाचे मंडळी, मामा, मामी यात आहेत. शेतकऱ्यांची कुटुंबे तर आमचे नवे नातेवाईक झाले आहेत. कुटुंबाचाच एक भाग बनले आहेत. असे म्हणतात ना की, हृदयात स्थान मिळवण्याचा मार्ग पोटातून जातो. तसे आम्ही अन्न-पदार्थांच्या बाजारपेठेतून एकमेकांना जोडले गेलेलो. एकमेकांच्या हृदयात निवास करत आहोत. ज्या व्यावसायिक मित्रांकडे पाहून, त्यांच्या ज्ञान, अनुभवाच्या शिदोरीचा आस्वाद घेत खूप काही शिकले. त्यांच्याशी गाढा संपर्क आहेच. ते आजही मार्गदर्शन करतात. चुका दाखवून देतात. त्यांच्यामुळेही मला मनापासून आवडणाऱ्या ‘विशुद्धम’च्या बोलक्या व्यवसायात भटकंती सुरू झाली आहे. काळ्या मातीचे मातेसमान प्रेम अनुभवत, आत्मिक शांततेच्या शोधात पहिले पाऊल पडले आहे.
https://www.facebook.com/vishuddham/
.......🌿🌿......
Comments
Post a Comment