शेतीचा श्रीगणेशा
शेतीचा श्रीगणेशा
--------
शेती म्हणजे बुडिताचा धंदा. त्यात काही राम उरलेला नाही, असं म्हणत अनेक तरुण गावांतून शहरात येतात. छोटासा व्यवसाय सुरू करतात. किंवा कारखान्यात कामगार होणेही स्वीकारतात. पण आम्हाला एक तरुण असा भेटला. ज्याच्या डोळ्यातील चमक काही वेगळीच होती. कारण उच्चशिक्षित असूनही तो नोकरीच्या मागे न लागता चक्क शेतीकडे वळाला.
त्याचे नाव गणेश जोशी. वय अवघे ३० वर्षे. शिक्षण एमए मास कम्युनिकेशन म्हणजे पत्रकारितेचे. पण वाट्याला आलेल्या तीन एकर जमिनीत नैसर्गिक शेती करत आहेत. कापूस, तूरडाळ, भाज्या, मोसंबी, हरभरा, ज्वारी अशी पिके घेऊन त्यांचा जीवनाशी हसतमुखाने संघर्ष सुरू आहे. आणि त्यांचा हा संघर्ष शेती सोडून शहराकडे धावणाऱ्या हजारो तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
पण हे कसे घडले. गावातून शहरात आणि शहरातून गावात गणेशचा प्रवास कसा झाला.
त्याची कहाणी अत्यंत रोचक आहे. घरी शेती होती. पण त्यातून पोट भरेल अशी स्थिती नव्हती. मग मास कम्युनिकेशनमध्ये एमए केल्यावर एकच मार्ग समोर दिसत होता. तो त्यांनी स्वीकारला. गणेश ‘सकाळ’ वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागले. चाकरमाने झाले. शेती विकून टाकावी. त्या पैशातून औरंगाबादमध्ये घर घ्यावे. एखादी चारचाकी खरेदी करावी, असे विचार घोळू लागले.
पण म्हणतात ना तुमच्या आयुष्यात काही चांगला बदल व्हायचा असेल तर तुम्हाला काही चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात यावे लागते. गणेशबद्दल अगदी तसेच झाले. काही कारणानिमित्ताने त्यांना आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार येथील आश्रमात राहण्याची संधी मिळाली. तेथील निवांतपणा होता. भरपूर वाचन झाले.
आणि मनात असे आले की आपण पुढच्या पिढीला फक्त भौतिक जगणे शिकवणार आहोत का? आपल्याकडे पिकणारे अन्न जर काळ्या मातीऐवजी रसायनांत बुडालेल्या जमिनीतील असेल तर पुढील पिढी कशी घडेल? आपण लहानपणापासून आई – वडिलांकडून जे शिकलो. जे संस्कार त्यांनी केले. त्यातूनच आपण आपले शिक्षण केले. उत्तम तब्येत राखली. हीच शिकवण, विचार-संस्कार आपण येणाऱ्या पिढीला देऊ शकलो नाही तर त्यांचा काय उपयोग?
झाले, विनोबांच्या आश्रमात विचार पक्का झाला. चौकटीतील नोकरी करण्याचे स्वप्न बाजूला ठेवून नैसर्गिक शेती करणे सुरू केले. ते वर्ष होते २०१६चे.
छोटेसे घर. आई-वडिल शेतावर. भरपूर कष्ट करायचे. पोटापुरते कमवायचे. उत्तम शुद्ध खावे आणि स्वतःला, कुटुंबाला तब्येतीत ठेवावे, असे ठरवले होते. त्यानुसार वाटचाल सुरू झाली. बायकोही शेतीत काम करू लागली. तिचे शिक्षण दहावीच. पण शेतीमध्ये अक्षरश: पीएच.डी. कष्टाची सगळी कामे स्वतः करणार. कोणते पीक घायचे. कधी घ्यायचे असे सगळे ज्ञान. एक मुलगी दहा आणि दुसरी सहा वर्षांची. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात आणि दोघी शेतातही कामे करतात. शाळेच्या टीसीवर मुलींसोबत आईचे नाव जोडले आहे, सगळी कमाई बायकोकडे देऊन स्वतः भरपूर काम करणे असे अगदी मस्त आयुष्य सुरू आहे. कोरोना काळात गणेश स्वत: मुलींचा अभ्यास घेत आहेत.
गणेशसोबत मनसोक्त गप्पा झाल्या. त्यांचे पोटाच्या आतड्यापासून काम करणे. कष्टाच्या फुलोऱ्यावर डोलत राहणे. चेहऱ्यावर कमालीचे समाधान, असे सगळे पाहून वाटले, आपण शहरात किती तडतड करत आहोत. पैसे हीच मुख्य गरज असल्यासारखे सगळे विसरत आहोत. अर्थात पैसा गरजेचा आहेच. पण त्यासाठी नुसतं वेगानं धावण्याची, एकट्याने धावत सुटण्याची गरज नाही. सावकाश वाटचालीत, सगळ्यांच्या सोबतीने चाललो तरी पैसा मिळतो आणि पैशानं विकत घेता येणार नाही. पैशात मोजता येत नाही एवढं समाधान मिळतं.
**

Comments
Post a Comment