सैन्द्रिय शेती ३
मशागत मातीची, सैन्द्रीय शेती किंवा नैसर्गिक शेती म्हणजे काय आणि त्यासाठी वापरले जाणारे अनेक प्रकारच्या निविष्ठा असे मागच्या दोन्ही भागात लिहिले होते. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये गाईचे शेण , गोमुत्र ह्याला अनन्य साधारण महत्व आहे तसेच ताक, मिरची आणि काही शेतात उगवणाऱ्या वनस्पती जसे टणटणो , निगुर्डीचा पाला वगैरे. अजून एका गोष्टीचे म्हणजे आच्छादन ह्यालाही महत्व आहे.
१९६०-६५ च्या दरम्यान शेती मधील उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने अनेक रसायनांचा आणि खतांचा वापर व्हायला सुरवात झाली. उतप्न्न वाढले परंतु मातीचा पोत बिघडत गेला. जमीन म्हणजे माती आणि पाणी हे दोन मुख्य घटक शेतीचे परन्तु अति रसायनांचा परिणाम मातीवर आणि औद्योगिक विकासामुळे पाण्यावर दिसू लागला. निकृष्ट जमीन आणि पाणी ह्यामुळे मिळणारे उतप्न्नहि निकृष्ट दर्जाचेच होऊ लागले. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर हि दिसून येत आहे. त्या बद्दल पुढे कधीतरी.
जमीन हे सर्वात महत्वाचे, मातीचा पोत उत्तम राखण्यासाठी अनेक पर्याय सैन्द्रीय शेतीमुळे वापरले जात आहेत. भारतीय परंपरे मध्ये गाईचे महत्व खूप आहे. आपण तिला गोमाताचा म्हणतो म्हणजे गाय दिसली कि आपले सगळ्यांचे हात आधी तिला नमस्कार करण्यासाठी जोडले जातात. त्यामुळे गाईचे शेण , गोमुत्र ह्यापासून अनेक घटक बनवले जातात. शेतकर्यांच्या घरात गाय असणे हे समृद्धीचे लक्षण आहे आपल्यासाठी.
सध्या सगळीकडे प्रयोग, innovation ह्याला इतके महत्व आहे कि सगळ्या क्षेत्रात Innovative काहीतरी केले जाते. खरे सांगायचे तर मी जेव्हा अनेक शेतकरी मित्रांना भेटत होते तर जाणवत होते ती त्यांची प्रयोगशीलता. अनेक प्रकरचे नत्र करण्यासाठीची, शेतीतील आंतरपिके घेण्यासाठीची.
आम्ही गेल्या चार महिन्यात खूप फिरलो, त्यातील काही शेतकऱ्यांकडील अनुभव इथे सांगते.सासवडच्या शेतकर्याची अंजिराची झाडे अगदी टोकापासून ते बुंध्यापर्यत अंजिराच्या फळांनी लगडलेली होती. तसेच त्याने तिथेच अनेक फळे, घरच्या साठी भाज्या असे अनेक पिके घेतली होती. सोलापूरच्या शिंदेच्या शेतातील मातीत हात घातला आणि हातात घेतली, त्यावेळेस जाणवले कि त्यांनी मातीला किती मुलासारखे जपले आहे, मऊसुत माती, मातीचा गंध, त्या मातीतील प्रत्येक पिकलेले धान्य तिथेच चव घेताना जाणवणारी चव असे अजूनही मनात रेंगाळत आहे. मातीचा कस वाढवताना त्याला कोणत्या निविष्ठाची गरज आहे, किती प्रमाणांची आवश्यकता आहे हे शेतकरी पुस्तकांमधून न शिकता त्याच्या रोजच्या जगण्यातून शिकला आहे. अगदी आम्ही बोपेगावच्या शेतकरी मित्राला भेटलो होतो तेव्हा त्याच्या २५ एकर शेतावरील अनेक प्रयोग बघून थक्क होत होतो. चिक्कू, पेरू, पपई, मका, गहू, भाज्या, strawberry, त्यामध्ये लावलेली नाजूक लसूण पात असे सर्व पाहून तेथून निघण्याचा मोह होत नव्हता.
सैन्द्रीय पद्धतीने शेती करताना जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे असते आणि त्यासाठीच सैन्द्रीय खतांचा वापर आवश्यक असतो. तसेच आच्छादनाचा वापरही आवश्यक असतो ह्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो. मातीतील गांडूळ आणि इतर जैव घटकांची वाढ होते आणि मातीचा पोत सुधारण्यास मदत होते. शेतीतील ह्या संपूर्ण प्रक्रियेला सहजीवन म्हणू शकतो. पीक फेरपालट केल्यामुळे ही मातीचा पोत सुधारण्यास मदत होते.
ह्या प्रकरच्या शेतीमुळे विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न मिळून आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
Anita Ghatnekar
Vishuddham
Soil to Soul
9881714890

Comments
Post a Comment