शेतीचा श्रीगणेशा
शेतीचा श्रीगणेशा -------- शेती म्हणजे बुडिताचा धंदा. त्यात काही राम उरलेला नाही, असं म्हणत अनेक तरुण गावांतून शहरात येतात. छोटासा व्यवसाय सुरू करतात. किंवा कारखान्यात कामगार होणेही स्वीकारतात. पण आम्हाला एक तरुण असा भेटला. ज्याच्या डोळ्यातील चमक काही वेगळीच होती. कारण उच्चशिक्षित असूनही तो नोकरीच्या मागे न लागता चक्क शेतीकडे वळाला. त्याचे नाव गणेश जोशी. वय अवघे ३० वर्षे. शिक्षण एमए मास कम्युनिकेशन म्हणजे पत्रकारितेचे. पण वाट्याला आलेल्या तीन एकर जमिनीत नैसर्गिक शेती करत आहेत. कापूस, तूरडाळ, भाज्या, मोसंबी, हरभरा, ज्वारी अशी पिके घेऊन त्यांचा जीवनाशी हसतमुखाने संघर्ष सुरू आहे. आणि त्यांचा हा संघर्ष शेती सोडून शहराकडे धावणाऱ्या हजारो तरुणांना प्रेरणा देणारा आहे. पण हे कसे घडले. गावातून शहरात आणि शहरातून गावात गणेशचा प्रवास कसा झाला. त्याची कहाणी अत्यंत रोचक आहे. घरी शेती होती. पण त्यातून पोट भरेल अशी स्थिती नव्हती. मग मास कम्युनिकेशनमध्ये एमए केल्यावर एकच मार्ग समोर दिसत होता. तो त्यांनी स्वीकारला. गणेश ‘सकाळ’ वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागले. चाकरमाने झाले. शेती विकून टाक...